आपल्या भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे पाडवा हा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून आनंदाने साजरा केला जातो. यादिवशी घराच्या प्रवेश दारावर, बाल्कनीमद्ये किंवा टेरेसवर पाटावर गुढी उभारली जातो. त्याभोवती छान अशी रांगोळी घालून फुलांनी सजावट करतात. विजयाचे आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक म्हणून आपण आपल्या घरी गुढी उभारतो. मात्र गुढी का उभारतात? गुढीपाडवा आणि चैत्र शुद्ध प्रतिपदेचा का संबंध आहे? गुढीपाडवा बद्दल प्रचलित असलेल्या पौराणिक कथा आणि आख्यायिका तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहे.
१. शालिवाहन शक
राजा शालिवाहनने गुढीपाडव्यापासून शालिवाहन युगाची सुरुवात केली. त्याने मातीच्या चिखलापासून सैन्यांचे पुतळे तयार केले, ते जिवंत केले आणि तत्कालीन शत्रूंवर विजय मिळवला अशी आख्यायिका आहे. या विजयामुळेच हा दिवस नवीन वर्ष म्हणून साजरा करतात.
२. महाभारतात गुढीपाडव्याचे वर्णन
देवराज इंद्राने प्रसन्न होऊन महाराजा उपरिचर याला एक काठी म्हणजे इंद्रध्वज दिला. महाभारतातील आदिपर्वामध्ये याचा उल्लेख आढळतो. इंद्र देवाचा आदर म्हणून उपरिचर राजाने ती काठी जमिनीत रोवली आणि त्याची पूजा केली. त्याचे अनुकरण करत इतर राजांनी देखील बांबूच्या काठीला रेशमी वस्त्र, अलंकार, गंध, फुलांचा हार घालून त्याची पूजा करण्याची प्रथा रूढ केली. ही कथा गुढीपाडवा साजरा करण्याचे आणखी एक कारण आहे.
३. विश्व निर्माणकर्ता ब्रह्म
चैत्र शुद्ध प्रतिपदा या दिवशी निर्माता ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. पाडव्याच्या याच दिवसापासून ‘सत्ययुग, सतयुग’ किंवा सुवर्णयुग सुरू झाले असा समज आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारून सकारात्मकता गोळा करण्याचा प्रतीकात्मक प्रयत्न केला जातो.
अजून वाचा: गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? गुढीपाडवा का साजरा केला जातो?

४. सृष्टीपालक विष्णूचा पहिला अवतार मत्स्य
भागवतपुराणानुसार सतयुग ते कलीयुगापर्यंत विष्णूने एकूण २४ अवतार घेतले त्यातली प्रमुख १० अवतार दशावतार म्हणून ओळखले जाते. दशावतारातील सर्वात पहिला अवतार म्हणून मत्स्य अवतार ओळखला जातो. समुद्रात जन्मलेल्या शंखासुराचा वध करण्यासाठी पाडव्याच्या दिवशी विष्णूने माशाचे रूप घेतले असे मानतात.
५. विजयाचे प्रतीक
गुढीपाडव्याला उभी केली जाणारी गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. प्रभू श्रीरामांनी लंकाधीश रावणाचा पराभव करून आणि आपला १४ वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत पुन्हा प्रवेश केला तेव्हा लोकांनी गुढी उभारून त्यांचे स्वागत केले.
अजून वाचा: गुढीपाडवा २०२४: यावर्षीचा पाडवा असणार आहे खास, जाणून घेऊ. एकाच वर्षात २ गुढीपाडवा?
६. वालीवर विजय
असे सांगितले जाते की, चैत्र शुद्ध प्रतिपदेला प्रभू रामाने वालीचा वध करून त्याच्या छळातून प्रजेला मुक्त केले; तो हा विजयोत्सवाचा दिवस. असूरी शक्तींचा दैवी शक्तीने नाश केला याचे गुढी ही सूचक आहे.
गुढीपाडव्यामागील या पौराणिक कथा आणि आख्यायिका आपल्याला नवीन सुरुवातीची आणि वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण करून देतात.
(या पानावरील माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या विविध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. वाचकांनी माहितीची सत्यता पडताळून पाहावी याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धा वा चुकीचे समज यांना दुजोरा देत नाही.)