गुढीपाडवा २०२४: यावर्षीचा पाडवा असणार आहे खास, जाणून घेऊ. एकाच वर्षात २ गुढीपाडवा?

एकाच वर्षी दोन गुढीपाडवा? यावर्षी गुढीपाडवा २०२४ हा मंगळवार, ९ एप्रिल या दिवशी म्हणजेच हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र शुक्ल प्रतिपदा विक्रम संवत २०८१ ला असणार आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

kasatarihotay.com2024 Gudi Padwa Marathi Embracing Prosperity and New Beginnings in Maharashtra

चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात गुढीपाडवा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. याच दिवशी हिंदू शालिवाहन दिनदर्शिकेनुसार नवीन वर्षाची सुरुवात होते. गुढीपाडवा हा साडे तीन शुभमुहूर्तांपैकी एक मानला जातो. नवीन वस्तू खरेदी करणे, व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी करणे यासारख्या बऱ्याच गोष्टी पाडव्याला केल्या जातात. दारी उभारलेली गुढी हे विजय आणि समृद्धीचे प्रतीक मानतात. लंकाधीश रावणावर विजय मिळवून प्रभू श्रीराम अयोध्येत परत आले. या विजयाचे प्रतीक म्हणून देखील गुढीपाडवा साजरा केला जातो. 

गुढी कशी उभारतात?

हिंदू कॅलेंडर महिन्याच्या चैत्राचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा. या दिवशी घरातील सर्वजण लवकर उठतात. अंघोळ वगैरे उरकून सूर्योदयानंतर गुढी उभारतात. बांबूच्या उंच काठीवर कडुनिंबाची डहाळी बांधून तिला रेशमी कापडाने किंवा साडीने गुंडाळले जाते. फुलांचा हार व साखरेची गाठी बांधून आणि वर तांब्याचे किंवा धातूचे भांडे ठेवून गुढी बनविली जाते. त्यानंतर गुढी घराच्या प्रवेशद्वारावर किंवा उंच टेरेसवर पाटावर उभी करतात. पाटाच्या सभोवती छान अशी रांगोळी घातली जाते. गुढीला गंध, फुले, अक्षता वाहतात व निरांजन लावून उदबत्ती दाखवतात. गोडधोड नैवेद्य दाखवून गुढीची पूजा करतात. संध्याकाळी हळद-कुंकू, फुले वाहून गुढी उतरवतात. हा उत्सव नवीन वर्षाची सुरुवात दर्शवितो, आणि लोक एकमेकांना ‘नवीन वर्षाच्या शुभेच्छा’ आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतात.

गुढीपाडवा हा भारतातील विविध प्रांतांमध्ये विविध प्रकारे साजरा केला जातो. कर्नाटक आणि आंध्र प्रदेश सारख्या राज्यांमध्ये याला संवत्सर पाडवो किंवा उगादी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात आपण गुढीपाडवा म्हणतो, तर सिंधी लोक तो चेटीचंद म्हणून साजरा करतात.

गुढीपाडव्याला केल्या जाणाऱ्या धार्मिक विधी

गुढीपाडव्याच्या दिवशी अंघोळ वगैरे दैनंदिन विधीनंतर गुढी उभारली जाते.नवीन वर्ष निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून गणपती आणि इतर देवांचे स्मरण आणि पूजा करतात. थोऱ्यामोठ्यांच्या आणि वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेतला जातो. यानंतर “संवत्सर फळ” खाल्ले जाते. पाडव्यापासून जे संवत्सर म्हणजेच वर्ष सुरू होत असते त्यातील विविध तिथींवरून संवत्सर फळ ठरवतात. वर्षप्रतिपदेच्या म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशी जो वार असेल त्या वाराचा जो ग्रह असेल तो त्या संवत्सराचा अधिपती असे मानतात. उदाहरण द्यायचं तर आजपासून सुरु होणारे नवीन वर्ष मंगळवारी सुरु होत आहे तर या वर्षाचा अधिपती असेल मंगळ. संवत्सर फळ ठरवताना वार, चंद्र, नक्षत्र, सूर्याचे विविध नक्षत्रप्रवेश, देश काल इत्यादी संदर्भ पहिले जातात. सृष्टी निर्मात्याने वर्षाच्या पहिल्या तिथीला सर्वात श्रेष्ठ पद दिले. म्हणून त्याला म्हणतात प्रतिपदा. या तिथीला ‘युगादी’ असेही म्हणले जाते. 

एकाच वर्षी दोन गुढीपाडवा?

हिंदू कॅलेंडर नुसार प्रति वर्षी फक्त एकाच गुढीपाडवा असतो. बाकीच्या सणांचे पण अगदी असच आहे. मात्र तुम्हाला आश्चर्य वाटेल, २०१६ म्हणजेच शालिवाहन शकाच्या १९८३ मद्ये एकाच वर्षात दोनदा गुढीपाडवा आला होता. २०१६ मधील गुढीपाडवा ८ एप्रिल २०१६ ला म्हणजेच शालिवाहन शके १९३८ ची शुक्ल प्रतिपदा. त्यानंतर च्या वर्षात म्हणजेच शालिवाहन शके १९३९ ची शुक्ल प्रतिपदा २९ मार्च २०१७ रोजी होती. मात्र ती क्षय तिथी असल्याने त्या दिवशी, म्हणजे २९ मार्च २०१७ रोजी गुढीपाडवा नव्हता. तो आदल्या दिवशी २८ मार्च २०१७ रोजी सकाळी ८.२७ वाजता फाल्गुन अमावास्या संपल्यावर साजरा केला गेला. एकाच शालिवाहन शक वर्षात दोन गुढीपाडव्याची ही अनोखी घटना दुर्मिळ होती.

अजून वाचा: गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? तो साजरा करण्यामागे ‘या’ अनेक कथा आहेत.

गुढीपाडव्याचा महाभारतात देखील उल्लेख आढळतो.

महाभारताच्या आदिपर्वात उल्लेख असलेल्या उपरिचर राजाने त्याला इंद्राने दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली. इंद्र देवाच्या आदरार्थ दुसऱ्या दिवशी असणाऱ्या नववर्षाच्या सुरुवातीला त्याची मनोभावे पूजा केली. या परंपरेचा इतका आदर केला गेला की इतर राजांनी काठीला वस्त्र, हार, गंध लावून त्याची पूजा करण्याची परंपरा पुढे चालू ठेवली. महाभारतातील ही कथा गुढीपाडवा परंपरेची प्राचीन उत्पत्ती सांगते.

गुढीपाडव्याबद्दल अनेक सांस्कृतिक कथा सांगितल्या जातात. 

परंपरेनुसार याच शुभ दिवशी भगवान ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली असे मानले जाते. गुढीपाडव्याशी जोडलेली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे प्रभू राम अयोध्येत परत आले. रावणाचा पराभव करून आणि चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र याच दिवशी अयोध्येत परतले, हा दिवस गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो.

जास्ती परिचित नसलेली अजून एक आख्यायिका गुढीपाडव्यासोबत जोडलेली आहे. 

प्राचीन काळात एका शालिवाहन नावाच्या मुलाने मातीपासून सहा हजार सैनिकांचे पुतळे बनवले. त्या सैनिकांच्या पुतळ्यांमद्ये जीव ओतून त्याने याच दिवशी शकांचा पराभव केला आणि त्या भागातला राजा होऊन शालिवाहन शक युगाची सुरुवात केली.

प्राचीन काळी जेव्हा लोक देव-देवतांची पूजा करत असत, तेव्हा त्यांनी देवतेला एका स्त्री चे रूप मानले. ती देवी म्हणजे आदिशक्ती आदिमाता पार्वती. माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या लग्नाची तयारी वर्ष प्रतिपदा पाडव्याला सुरु झाली आणि तृतीयेला त्यांचे लग्न झाले. म्हणून पाडव्याला पार्वतीच्या शक्तिरूपाची पूजा करतात. यालाच चैत्र नवरात्र म्हणतात.

गुढी शब्दाचा नक्की अर्थ काय?

आंध्रप्रदेश आणि तेलंगणा मद्ये बोलली जाणाऱ्या तेलुगू भाषेमध्ये ‘गुडी’ या शब्दाचा अर्थ ‘मंदिर, लाकूड, काठी, तोरण’ असा आहे. त्याचप्रमाणे, हिंदीमध्ये, ‘कुडी’ म्हणजे झोपडी किंवा लाकडाची कुटी. शालिवाहन काळापूर्वी महाराष्ट्रामध्ये ‘गुढी’ चा लाकूड किंवा बांबूची काठी असा अर्थ अधिक प्रचलित असावा असा अनुमान आहे. शालिवाहन राजघराण्याचा सध्याच्या आंध्र प्रदेश आणि तेलंगणा भागाशी जवळचा संबंध असल्याने, ‘गुढी’ या शब्दाचा अर्थ ‘काठी किंवा तोरण’ असाच राहिला असावा.

गुढीपाडव्याचे आरोग्यदायक महत्त्व:

ओवा, मीठ, हिंग, मिरी आणि गूळ यांचे मिश्रण कडुनिंबाच्या पानांबरोबर वाटून ते प्रसाद म्हणून खाणे ही गुढीपाडव्याची प्रथा आहे. कडुनिंबाची पाने त्यांच्या औषधी गुणधर्मांसाठी ओळखली जातात. आयुर्वेदात पचन क्रिया सुधारण्यासाठी, पित्तनाशक, त्वचेच्या रोंगावर उपचारक, धान्यातील कीड रोधक आणि असे बरेच काही औषधी गुण कडुनिंबाच्या अंगी आहेत असे सांगितले आहे. बऱ्याच ठिकाणी शरीराला थंडावा मिळावा म्हणून अंघोळ करताना त्यात कडुनिंबाची पाने टाकली जातात.

अजून वाचा: गुढीपाडव्याचे महत्त्व काय आहे? गुढीपाडवा का साजरा केला जातो?

गुढीपाडव्याला भारताच्या वेगवेगळ्या भागात काय म्हणतात?

भारतातील विविध प्रांतांमध्ये, नवीन वर्ष वेगवेगळ्या तारखांना आणि वेगवेगळ्या नावांनी साजरे केले जाते:

महाराष्ट्र:

शालिवाहन शक म्हणून ओळखले जाणारे नवीन वर्ष चैत्र शुद्ध प्रतिपदेला सुरू होते. गुढीपाडवा म्हणून हा सण घरोघरी गुढी उभारून साजरा केले जातो. 

बंगाल:

पश्चिम बंगाल आणि बांग्लादेशातील बंगाली लोकांमध्ये पहिली बैशाख ही नोब बोर्श (नवीन वर्ष) म्हणून ओळखले जाते जेव्हा सूर्य मेष राशीत प्रवेश करतो.

तामिळनाडू:

पुथंडू नावाने तामिळनाडूमधील तामिळी लोकांमध्ये नवीन वर्ष साजरे करतात. 

कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा:

उगादी म्हणून ओळखला जाणारा नवीन वर्षाचा पहिला दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.

अजून वाचा: लहान मुलांसाठी ‘या’ सामानांची मोठया प्रमाणात खरेदी होतेय.

आसाम:

नवीन वर्षाची प्रतिपदा, बिहू सण म्हणून साजरी केली जाते.

केरळ:

केरळमधील मल्याळी लोकांमध्ये विशू नावाने नवीन वर्ष साजरे होते.

पंजाब:

नवीन वर्षाचे प्रतीक असलेला वैशाखी किंवा बैसाखी सण, ज्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो तेव्हा साजरे होते.

सिंध

सिंधी लोकांमध्ये चेती चंद म्हणून गुढीपाडवा ओळखला जातो. या दिवशी ताहिरी म्हणजेच गोड भात आणि साई भाजी यासारखे पदार्थ बनवून झुलेलालला प्रार्थना केली जाते. हा सण झुलेलालच्या दिवसाचा उदय म्हणून साजरा केला जातो.  

जम्मू आणि काश्मीर:

काश्मिरी पंडितांमध्ये नवरेह म्हणून नववर्ष सुरु होते.

कोकण:

गोव्यातील हिंदू कोकणी आणि केरळमधील कोकणी यांच्यामद्ये संवत्सर पाडो म्हणून गुढीपाडवा साजरा होतो. 

प्रांतानुसार नवे वेगवेगळी असली तरी प्रत्येक उत्सव आपापल्या प्रदेशात अनोख्या परंपरा आणि चालीरीतींसह नवीन वर्षाची सुरुवात करतो.

(या पानावरील माहिती इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या विविध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. वाचकांनी माहितीची सत्यता पडताळून पाहावी याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धा वा चुकीचे समज यांना दुजोरा देत नाही.)

आता ताज्या बातम्या सर्वप्रथम मिळवा

केवळ महत्वाच्या निवडक बातम्याच तुम्हाला पाठवल्या जातील. आमची Privacy Policy वाचा.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top