2024 लोकसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना या महायुतीतील प्रमुख दावेदारांमध्ये महाराष्ट्रातील आठ जागांवरून अजूनही एकमत झालेले दिसत नाही. महाविकास आघाडीच्या प्रचारापासून एक पाऊल पुढे राहण्यासाठी महायुतीतील पक्षश्रेष्ठींनी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षाची एकत्र प्रचार करण्याची रणनीती आखलेली दिसून येते. पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी आपापल्या पद्धतीने प्रचार चालू करावा असे आदेश पक्षश्रेष्ठींनी कार्यकर्त्यांना दिलेले आहेत.
महाराष्ट्रातील या आठ जागांवर उमेदवारांमध्ये अजूनही संभ्रम
लोकसभेच्या निवडणुकांसाठी तिसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्याची सुरुवात झाली असली तरीही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे महाराष्ट्रातील आठ जागांमधील उमेदवारांना प्रचार करण्यावरती बंधने येत आहेत. राज्यातील पक्षनेतृत्वाने यावर तोडगा म्हणून पक्षातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना आपापल्या मतदारसंघात प्रचार करण्याचे आदेश दिलेले आहेत. मुंबईतील दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई आणि अजून एक जागा तसेच ठाणे, पालघर, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर या जागांवरती महायुतीच्या उमेदवारांचा अजूनही संभ्रम आहे. महायुती महाराष्ट्रातील या आठ जागांवर लवकरच उमेदवार जाहीर करेल अशी कार्यकर्त्यांना आशा आहे.
एकच ध्येय ठेवून महायुतीचा एकत्र प्रचार
महाराष्ट्रातील आठ जागांवरती जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार करण्यास सुरुवात करावी असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. लोकसभेच्या निवडणुकीची तयारी म्हणून जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न इच्छुक उमेदवारांनी करण्यास सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडून देण्यासाठी ज्या मतदारसंघात भाजप पक्षाचे कमळ, शिवसेना शिंदे गट पक्षाचे धनुष्यबाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांचे घड्याळ चिन्ह असतील तिथे तिथे या चिन्हांवरती भरघोस मतदान करण्याचे आवाहन वेगवेगळ्या मतदारसंघातून दिल्याचे जाणवते.
हे आहेत महायुतीचे इच्छुक उमेदवार
दक्षिण मुंबई मतदार संघात भाजपकडून राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा इच्छुक असल्याचे दिसून येते तर शिंदेंच्या शिवसेनेकडून मिलिंद देवरा इच्छुक असल्याचे जाणवते.
उत्तर मध्य मुंबईमध्ये भाजपचे विद्यमान खासदार पूनम महाजन तसेच भाजपचे नेते आशिष शेलार यांनी प्रचाराला सुरुवात केल्याचे दिसून येते.
शिवसेनेचे रवींद्र फाटक, नरेश मस्के तसेच भाजपकडून संजीव नाईक ठाण्यामध्ये इच्छुक उमेदवार असल्याचे प्रकर्षाने जाणवते.
पालघर मध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावित इच्छुक असल्याचे दिसते.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेकडून किरण सामंत आणि भाजपकडून नारायण राणे प्रचार करत आहेत. विद्यमान खासदार हेमंत गोडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ हे नाशिक मतदारसंघांमध्ये जोमाने प्रचार करताना दिसून येत आहेत.
महायुतीमध्ये स्वतःच्या पक्षातील उमेदवार किंवा मित्र पक्षाला उमेदवारी मिळाली असेल त्यांचा संयुक्त प्रचार करावा; कार्यकर्त्यांनी नाराज होऊ नये असे आदेश पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. 2024 लोकसभेचे एकच ध्येय हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा सरकार प्रस्थापित करता यावे हे असल्यामुळे महाराष्ट्रात महायुती जोमाने प्रचारास लागल्याचे जाणवते.