गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी बाजारात सोन्याची खरेदी जास्त होताना दिसून येते. यामुळेच सध्या देशभरात सोन्या-चांदीच्या दरात मोठी विक्रमी वाढ झाली आहे. सोन्या-चांदीचे दागिने खरेदी सोबतच, गोल्ड ईटीएफ आणि गोल्ड बॉण्डबद्दल गुंतवणूकदार अनुकूल आहेत. सोन्या-चांदीचे दर सर्वोच्च पातळीवर असताना गुंतवणूकदार आणि ग्राहकांनी नक्की काय करावे हे समजून घेऊ.
सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ का आहे?
मागील आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये गुंतवणूकदारांना गुंतवणुकीसाठी चांगले दिवस होते. शेअर बाजारासोबत, सोने आणि चांदी मध्ये सुद्धा गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळाला. सध्या सेन्सेक्सने 75,000 अंकाची पातळी ओलांडली आहे तर सोन्याचा भाव एका तोळ्यासाठी 72,000 रुपये झालेला आहे. तसेच चांदीमध्ये सुद्धा एका किलोमागे 82 हजार रुपये भाव मिळाला. त्यामुळे सध्या बाजारात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण असल्याची हमी वाटते. मात्र सोन्यात गुंतवणूक करण्याची हीच सर्वोत्तम वेळ आहे का याबद्दल मोठे प्रश्नचिन्ह आहे.
सोन्याचे भाव दिवसेंदिवस वाढत असताना तुम्ही गुंतवणूक करावी की नाही?
ज्या गुंतवणूकदारांनी सोन्यामध्ये गुंतवणूक केली त्यांना 14%, चांदी मध्ये गुंतवणूक केली त्यांना 9% तसेच ज्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक केली त्यांना साडेचार ते पाच टक्क्यांनी परतावा मिळाला आहे.
आनंद राठी शेअर्स आणि स्टॉक ब्रोकर्समधील कमोडिटीज आणि करन्सी तज्ञ, नवीन माथुर यांच्या मते, अर्थव्यवस्था चांगली चालत असेल तर सोन्याच्या किमती वाढतात. सोने, चांदी आणि शेअर बाजार एकाच वेळी चांगली कामगिरी करणे हे सहसा घडत नाही. मात्र सध्या अर्थव्यवस्था गुंतवणूकदारांसाठी अनुकूल असून सोन्यासारखे मौल्यवान धातूंच्या किमती देखील दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत.
सोन्यामध्ये हळूहळू गुंतवणूक करा.
सोन्याच्या सतत वाढणाऱ्या किमतीमुळे नफा मिळवण्यासाठी गुंतवणूकदार सोने विकू लागतील. त्यामुळे सोन्याच्या भावामध्ये घसरण देखील होऊ शकते. अशा परिस्थितीत गुंतवणूकदारांनी हळूहळू सोने खरेदी करणे शहाणपणाचे ठरेल. असे नवीन माथुर सुचवतात.
सोन्यामधील ही वाढ टिकून राहण्याचे संकेत
कमोडिटी तज्ञ अजय केडिया यांच्या विश्लेषणानुसार, 100 दिवसात जेव्हा सोन्याचा भाव 20 टक्क्यांनी वाढला आहे. तेव्हा तो दीर्घकाळ टिकला आहे. यातून सध्या सोन्याचा भाववाढ टिकून राहण्याचे संकेत मिळतात. सध्याच्या सोन्या-चांदीच्या दरवाढी मागे शेअर बाजारातील अनुकूल परिस्थिती कारणीभूत असल्याचे देखील त्यांनी नमूद केले.